गुरुवार, १४ मे, २०१५

"तिची कहाणी "



आज फारच एकटं वाटतंय म्हणून तुला फोन केला...... पलीकडून तिचा आवाज!..... आणि मग मीच जरा स्तब्ध झाले ..... काय बोलावे, पटकन काही कळेना. ती मात्र खुप काही बोलण्याकरिता आतुर वाटली. मी देखील विचारात हरवून गेले होते. ती माझ्या उत्तराची वाट पाहत होती. मी भानावर येत म्हटलं, अगं बोलना.....!.
मला भेटशील का? ती….
मला तिच्याबद्दल पूर्ण सहानुभूती होती, पण मी माझ्या संसारातील रोजच्या व्यवधानांमध्ये पार बुडून गेले होते........ हो नक्कीच....! मी. खरेतर मला अजिबात वेळ नव्हता. लेकीला शाळेत सोडायचे होते, नव-याने बँकेत जाऊंन एक एफडी क्लियर करायला सांगितले होतेघरातील कामं राहिली होती ती वेगळीच ..... माझ्या डोळ्यासमोर सर्व भरभर नाचू लागली...... कधी व्हायची सगळी? पण तिला मी नकार देऊ शकले नाही.  हो! येते ना! आज मात्र जमणार नाही उद्या येईन. चालेल?
पण नक्की येशील ना? तिचा अगतिक प्रश्न.
हो उद्या संध्याकाळी भेटूया ... मी.
पण माझ्या घरी नको. आई असेल .... तुला पाहून उगीचच वैतागेल...... ती. आपण बाहेर भेटू. आपल्या नेहमीच्या मंदिरात? मी. हो चालेल ..... तिने फोन ठेवला .......!
मला उद्याची कामेही आज करणे भाग होते..... एकेक करून आटपायला हवीत. भरभर कामाला लागणे आवश्यक होते ....... पण मी मात्र थंड होते.
काहीशी अस्वस्थ झाले होते!तिचा विचार मनातून काही जात नव्हता.उद्या ती भेटणार आहे .....  तिला माझ्याशी नेमकं काय बोलायाचे असेल? तिला मी अधूनमधून फोन करत असे ....मध्ये एकदा तिला भेटले देखील होते, पण तिची ती विचित्र अवस्था आणि तिला होणारे भास्! मी तेंव्हाच फार घाबरले होते, तरीपण तिला धीर देण्यासाठी तिच्याशी खूप बोलले ... तिला सावरण्याचा प्रयत्न केला होता पण ......?त्यानंतर भेट नव्हती झाली तिची-माझी....खरंतर तीच मला नेहमी फोन करायची. मी जुजबी काही तरी बोलत राहायची .. ती मात्र उत्साहाने तिच्या नवीन उपक्रमांविषयी भरभरून सांगत असायची .... मी तिचे तोंडभरून कौतुक करायची ... तिला प्रोत्साहित करायचे, पण तिला प्रत्यक्षात कधी भेटले नाही .....फक्त एकदाच भेट झाली, तिच्या लग्नात ......!किती खुश होती ती.... आणि तिचे सारे आप्त ..... मी सुद्धा .....त्या भयाण स्वप्नातून, भासांतून ती आता वर्तमानात जगणार होती ...! तिच्या डोळ्यात आता भावी संसाराची स्वप्नं फुलली होती....! मी अगदी वेळात वेळ काढून तिला आवर्जून शुभेच्छा देण्यास तिच्या लग्नाला गेले...! तिचे सौंदर्य अधिकच खुलले होते...! कॉलेजमध्ये तिच्या आगेमागे मुलांचे घोटाळणे आठवले ... पण तिने तेव्हा कुणालाच भीक घातली नाही. त्या मनस्वीचे स्पष्ट म्हणणे होते.. जो फक्त माझ्या सौंदर्यावर भाळेल, त्यास मनाचे सौंदर्य काय कळणार....? माझ्या सौंदर्यास भुलून माझ्यावर प्रेम करतो तो तर माझ्या शरीरावर प्रेम करतो...!आणि हीच मनस्वी मुलगी "त्या" नीच माणसाच्या प्रेमात पडावी? मला तिच्या ह्या प्रेमाबाबत कळले तेव्हा  मी तिला खूप समजावले.... तिचा तो तथाकथित प्रियकर मी पाहिला आणि मी तिच्यावर चिडले..... ही तुझी चॉइस...! काळाकभिन्न, तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा...! त्याचे कर्तृत्व काय तर समाजसेवा ...... ! मी तिला प्रॅक्टिकल विचार करायचा सल्ला दिला.... समाजसेवा वगैरे गोष्टी ऐकायलावाचायला छान ..... पण तुझा तो पिंड नाही... की, तू संसाराचा भाग म्हणून ह्या गोष्टी स्वीकारशील! .... पण ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली. म्हणाली ...... त्याने माझे सौंदर्य नाही पाहिले ..... मी जेव्हा कुणाला पहिल्यांदा भेटते तेव्हा ती व्यक्ती माझ्याकडे परत वळून पाहतेच ... याचा अपवाद. मी प्रथम त्याला भेटली तेव्हा त्याने माझ्याकडे एकदाही पाहिले नाही.....! हाच तो .... जो माझ्या सौंदर्यावर भाळला नाही... मी स्वत: जर बाह्य सौंदर्याला महत्त्व देत नाही, तर त्याचे दिसणे मला बिलकुल महत्त्वाचे नाही....! आणि जो मनुष्य दुसर-याच्या सुखदु:खाचा विचार करतो तो मनाने किती प्रेमळ असेल....?पण प्रेमाची ही धुंदी लवकरच उतरली....! समाजसेवेच्या बुरख्याआडचा त्याचा खरा चेहरा खूपच भेसूर, निर्दयी आणि स्वार्थी होता...... खरं तर त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी धारण केलेला तो बीभत्स मुखवटा होता....! जेव्हा तिला हे कळले, ती पूर्ण उद्ध्वस्त झाली ....!  मी त्याला ओळखू शकले नाही... मी मलाच फसविले...... तिने स्वत:ला कोंडून घेतले.... वर्षभर ती स्वत:मधेच गुरफटून गेली.. घुसमटली! आत आत तुटत गेली..... आणि मग त्या भयाण भासांमध्येच जगणे सुरु झाले...या सर्व दुष्टपर्वात ती एकटी पडली ...... घरातून-बाहेरून .... तिच्याकडे वळणारी प्रत्येक दृष्टी तिच्यावर हसते आहे ... असे वाटत गेले.....! हो, तिला स्कीजोफ्रेनिया झाला.....!काही वर्ष तिच्यावर उपचार झाले..... ती पूर्णपणे बरी झाली.....  आणि तिचे लग्नही झाले..... ती सुखाने संसार करू लागली....! असे खरेच झाले असते तर ...?  पण तिचे लग्न झाले आणि तिला परत त्या भासांनी घेरले... ती परतली  .....होती तिथेच येऊन ठेपली...! एकटी.....!संध्याकाळी मुलीला स्केटींग क्लासला सोडले आणि मी मंदिरात पोहचले  ..... ती कुठेच दिसली नाही ... मी मंदिराबाहेरच्या चौथ-यावर बसून विचार करत होते. एवढ्यात ती आलीच ..... ती आली आणि मी पाहतच राहिले ..... चेह-यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू लागल्या होत्या, शरीर सुटले होते ... खरं तर ती माझ्यापेक्षा एखाद वर्षाने लहानच पण आता तिच्याकड़े पाहून मात्र ती प्रौढा वाटत होती. मी स्वतःला सावरले ..... भेटल्याचा आनंद चेह-यावर आणत तोंडभरून हसले .... तिचेही निस्तेज डोळे चमकले ...कशी आहेस .....? माझ्या प्रश्नावर हसून विचारले .... कशी दिसतेय ....मी किंचित हसून म्हटलं, छान दिसतेस ...!माझ्या बोलण्यावर अजूनच जोरात हसत म्हणाली. छान दिसतेय?” मी क्षणभर घाबरले ....महिन्याभरापूर्वीच मी हॉस्पिटलमधून घरी आले ....!"मला काहीच माहित नाही ...." मी. म्हणजे पुन्हा तुला तसे भास......?? तिच्या डोळ्यात मला तीच ती फोनवरील अगतिकता प्रत्यक्षात दिसत होती .... हो .... गं .........सांग ना  मी काय करू ...... .?  माझ्याकडेही या प्रश्नाचे उत्तर नव्हते.वीस वर्षापूर्वी प्रेमभंगातून आलेल्या डीप्रेशनने या मनस्वी मुलीला स्कीजोफ्रेनियाने घेरले .....!तिचे भास तरी कसे .....? त्या भासांबाबत ती बोलूही शकत नाही ..... असे भास जे जणू तिच्या संपूर्ण अस्तित्वाचा घास घेतील .....! मला यातून बाहेर पडायचे आहे नाहीतर ते भास माझा बळी घेतील ... मीच माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. ती हतबल होऊन बोलत होती .…!!"मी घर झाडत असेन ना की, मला वाटते मी कुंटणखाना झाडते आहे  … ! खिडकीतून कधी बाहेर पाहावे तर वाटते मी एक वेश्या आहे आणि मी या खिडकीत उभी आहे तर बाहेरील सर्व याच गलीच्छ नजरेने माझ्याकडे पाहत आहेत. मला माझ्या बाबांकडे पाहायची लाज वाटते आईपासून लांब पळावेसे वाटते. मध्ये मी गाण्याचा क्लास पुन्हा सुरु केला होता, पण तिथेही नाही रमले! रेकी शिकले, पण काही फरक नाही. नोकरीसाठी या अवस्थेत मी बाहेर पडू शकत नाही. मी पुन्हा पुन्हा गूढ़ अंधारात फेकली जाते आहे… !मला यातून बाहेर पडायचे आहे. तू मला मदत करू शकतेस असं मला मनापासून वाटते. प्ली, करशील ना मला मदत! तिने माझा हात तिच्या हातात घेतला … !  मला तुझ्यातली शक्ती दे  तुझ्यातला आत्मविश्वास दे  तुझ्यातील सकारात्मक वृत्ती दे  …” तिने माझा हात आता अधिकच घट्ट धरला होता  … ! मीही तो तसाच राहू दिला! माझ्याकडून तिला क्षणभर का असेना दिलासा व आधार  मिळत असेल आणि ती मनाने सावरणार असेल, बरी होणार तर मिळू दे तिला माझ्यातली शक्ती, जागूं देत तिच्यात माझ्यातला आत्मविश्वास.... !!"हे बघ असे भास होऊ लागले की, लगेच ती वाईट विचारांची साखळी तू मनामध्ये दुसरा काही तरी चांगला विचार आणून तोडून टाक...  अध्यात्माची पुस्तके वाच ... गुरुप्रार्थना कर ...... हाणून पाड ते घाणेरडे विषयासक्त विचार .........! मी तिच्याशी असं बरंच बोलले. ती एव्हाना बरीच शांत झालेली वाटत होती ........तिला माझ्याशी अजून खूप बोलायचे आहे, हे दिसत होते. पण संध्याकाळ बरीच झाली होती. माझे मन माझ्या लेकीकडे धाव घेत होते .........!  चल मी निघते परत एकदा भेटू .....!नक्की भेट ....! तिच्या डोळ्यात चमक होती! "तू भेटलीस की परत जगायला हुरूप येतो नाहीतर"  ..... तिने एक दीर्घ उसासा सोडला ...... तिला परत भेटण्याचे कबूल करूंन मी तिथून निघाले .....!!माझे मन आता तिच्या त्या विचित्र भासांचा विचार करू लागले होते...... क्षणभर माझी मीच दचकले ....! आणि    मी माझ्या लेकीचा विचार मनात आणून ती भयंकर साखळी तत्क्षणी तोडून टाकली ...... इतक्यात समोर माझी लेक हात पसरून माझ्या दिशेने झेपावली ......आणि मी भासांतून जागी झाले! क्षणात मी एखाद्या गूढ़गर्द अंधारात जाऊन आल्यासारखे, परतून माघारी फिरल्यासारखे वाटले …! तिच्याजवळही तिचे आपले कुणीतरी कुणीतरी त्या भासातून जागवणारे हवे होते....! ...... ती सर्वार्थी अतृप्त आहे ..........!मी पुन्हा तिला भेटले नाही  भेटू शकत नाही  माझ्यात ती हिंमत उरली नाही! मला मनातून खूप अपराधी वाटतंपण मलाच आता तिच्या गू अंधाराची भीती देखील वाटतेय ....!!

                                              " समिधा "