सोमवार, १६ एप्रिल, २०१८

एक संध्याकाळ मंतरलेली...........!

एक संध्याकाळ मंतरलेली...........!

     मराठी "गझल" साम्राज्याचे अनभुशिक्त सम्राट आदरणीय गझलकार  सुरेश भट यांच्या जयंतीनिमीत्त कल्याण पु.ल. कट्टा येथे  कल्याण काव्यमंच व  चारमित्र  यांच्या संयुक्त विद्यमाने "गझल सरीं" हा मराठी गझल मुशायराचे आयोजन केले होते.

     एेन रणरणत्या उन्हाळ्याच्या दिवसातली कालची संध्याकाळ रम्य अगदी मंतरलेली होती.  एक डेरेदार पारंब्यांनी मढलेला हिरव्यागार वृक्षाचा पार म्हणजे व्यासपीठ आणि त्याच वृक्षाच्या विशाल  खांद्यावर कल्याण काव्यमंच व  चारमित्र  या साहित्य चळवळीचे दिमाखदार बैनर बस्स !
      हया नैसर्गीक नेपथ्याच्या पार्श्वभुमीवर आजच्या गझलसरींची बरसात रंगतदार होणारच  हे गझलसरींमध्ये चींब भिजण्याच्या लालसेने आलेल्या रसिकजनांच्या उदंड प्रतिसादावरून दिसत होतेच....!
या गझलमुशाय-यात  महाराष्ट्रातील नवोन्मुख युवा तसेच ज्येष्ठ गझलकार असा सुंदर समन्वय साधून "गझलसरींचा " वर्षाव हा नुसता मनाला चींब करणारा नाही तर अंतरमनातील सृजनतेला साद घालणारा होणार हे निश्चित हेते.!
        थोडयाचवेळात हे स्थिर शांत चित्र सजीव होत गेलं ते कल्याण काव्यमंच चे हरहुन्नरी उत्साहr आणि कविता म्हटले की आनंद सागराचा तळ ढवळून काढणारे श्री. सुधीर चित्ते सरांनी आपल्या जादुई शब्दांतून प्रस्तावना करायला सुरूवात केली तेव्हा!  या खास या कार्यक्रमासाठी आलेल्या श्री. संदिप गुप्ते  ज्यांनी 76 वा गझल मधील  "दिवाण"  लिहीला त्यांचे खास स्वागत करण्यात आले.  श्री. संतोष हुदलीकर हे खास सपत्निक नाशिकहून या कार्यक्रमासाठी आले होते त्यांचेही स्वागत करण्यात आले!  उत्साही प्रस्तावने नंतर प्रत्यक्ष "गझलसरी"  मुशायराची प्रमुख सुत्र  कल्याण काव्यमंचचे ज्येष्ठ गझलकार श्री. प्रशांत वैद्य यांच्याकडे सुपूर्द केेली....!
     श्री. प्रशांत वैद्य म्हणजे "गझल" मधील दादा माणूस !

शेवटी शेवटी जेव्हा मला मी उमगलो होतो
आतल्या आत मी तेव्हा खुपदा बरसलो होतो !

अशा या मनस्वी आणि संवेदनशील गझलकाराने अतिशय प्रसन्नतेने गझल मैफीलीची सुरूवात करून देतानाच ......

नेल्या जरी उन्हाने माझ्या गझलसरी
आल्या पुन्हा नव्याने माझ्या गझलसरी!

अशा सुंदर शेराने मुशाय-यात सामील सर्व गझलकारांचे सुंदर स्वागत केले.....!

प्रत्येक शायर ची ओळख म्हणजे त्याचा एक एक शेर असतो याचा प्रत्यय मग सामील प्रत्येक गझलकाराच्या गझलीयत मध्ये दिसत गेला....!!

विजय उतेकर मुंबई....

होतात वार सारे पाठीवरीच माझ्या
तू वार मोजताना मागून मोजणी कर  !

किंवा
सुर्य कलतो जीवघेणा काळ येतो
सावल्या मी चोरल्याचा आळ येतो..!

स्पर्श झाला जुना झाल्या जाणिवा
शहारा हा तरी तात्काळ येतो...!

 तसेच

पाहुनी लगबग समाधीवर फुलांची
चार स्वप्ने आत्महत्येवर निघाली!

असे एकापेक्षा एक जीवघेणे शेर आणि मैफील रंगत गेली... क्षणात मुग्ध झाली......

जयश्री कुलकर्णी नाशिकच्या तरूण युवा शायरा... !

अतिशय सयंत तरिही टोकदार शायरी....
 वाटे वाटे नको नको जे वाट्यास येत आहे
करतोस तुच दैवा गोलमाल हा बहुदा ...!

किंवा -

ईतके कुठून आले रस्त्यात खाचखळगे
तत्वानुसार केली वाटचाल बहुदा ...!

क्या बात  क्या बात रसिंकांचा उदंड प्रतिसाद.... आणि मैफल रंगत होती, सोबत प्रशांत वैद्यांचे सुत्रसंचालन हास्य आणि मिश्किली बहार आणत होते....!  दर्दींची गर्दी वाढत होती....
मध्येच प्रेमळ अपर्णाताईची , चित्ते सरांची रसिक प्रेक्षकांना पाणी चहा देण्याची लगबग आणि तत्परता पाहून कार्यक्रमाच्या नियोजनाला दाद मिळत होती.!

आणि मग अजित मालंडकर यांच्या तरंन्नुम मध्ये सादर केलेल्या गझल म्हणजे मुशायराची चढती कमान होती....




शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

स्री पुरूष मैत्री एक दिवास्वप्न !

      अहो ..... तुम्ही आरशात पहा जरा स्वत:ला !   बघा  तरी कसा अवतार झालाय ? पोटाचा घेर वाढलाय, चेहरा केवढा ओढल्यासारखा दिसतोय ! स्वत:कडे लक्ष द्या नं जरा.  किती काम आणि काम करीत रहाल?  कीती वेळा तुम्हाला हे सांगितलं पण तुम्ही  माझं कशाला एेकाल... तुम्हाला एखादी मैत्रीण असती तर बरे झाले असते .... निदान तिचे तरी एेकलं असतं.! असं मी माझ्या प्रिय नव-याला बोलते .... तेव्हा त्यांच्या चेह-यावर मिश्कील हसू तरळतं...! हे मी माझ्या पतीला एवढ्या सहज बोलू शकते तितक्या सहज मी त्याची मैत्रीण खरंच स्वीकारेन का?

     मी एक स्त्री  आहे  आजची आधुनिक पुरोगामी  विचारांची  … तरीही माझ्या विचारांना पारंपरिक संस्कारांची एक बैठक आहे ! पुरोगामी विचारांच्या तळाशी अभेद्य अश्या परंपरेची घट्ट वीण आहे तिची गाठ माझ्या दैनंदिन व्यवहारपासून ते एकूण  जीवन मूल्यांपर्यंत वेढली आहे !  अश्या ह्या समांतर रेषेतील जगण्यात मी माझे स्त्रीत्वाचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करते  …  तेंव्हा माझा स्वत:शीच मानसिक संघर्ष खुप होतो.

     मग हा संघर्ष होत असतांना आपल्या मनातील प्रत्येक विचाराला नैतीक अधिष्ठान असतेच असे नाही. कारण हा संघर्ष खरंतर  मन आणि बुद्धी यांच्यात होत असतो.  

     जेव्हा  हा  पुरोगामी आणि पारंपारीकतेचा संघर्ष स्री-पुरूष नातेसंबंध असा माझ्या आत होत असतो तेव्हाच्या विचारसंक्रमणात  आपण आपल्या काही नितीमुल्यांचा पुन्हा एकदा नव्याने आणि अधिक प्रगल्भतेने विचार करावा असे वाटते. तेव्हा वाटते आपले अस्तित्व ज्या परंपरा संस्कार यांच्या पायावर उभे आहे त्यांना पुन्हा एकदा स्री-पुरूष दोघांनीही नव्या दृष्टीकोनातून तपासले पाहिजे आणि काळाप्रमाणे त्यांचा स्विकार करून जगणे अधिक समृद्ध केले पाहिजे ! पण जगणे समृद्ध करणे म्हणजे नेमके काय? सहज, सोपे, सुटसुटीत जगता येणे  या जगण्याला मी समृद्ध मानते.  जिथे प्रत्येक विचारात सुस्पष्टता असते,  गृहितकांना स्पष्ट नकार असतो, आणि प्रत्येक विचारामागे कृतीमागे आयुष्याला अधिक अर्थपुर्ण करण्याची आस असते, एवढेच नाही तर त्या नात्यामुळे आपल्या जगण्याला उर्जीत चालना मिळणे अपेक्षीत असते.

     प्रत्येक नात्यामध्ये ज्याची त्याची स्वतंत्र जागा असावी.  पण ही जागा कोणत्याही नात्याच्या दृढतेला विश्वासाला धक्का देणारी नसावी.  नात्यांमधील आस्था , प्रेम हे कृत्रीम न रहाता ते अधिक सकस आणि सजीव व्हायला पाहिजे.   प्रत्येकाचे एक  स्वतंत्र भावविश्व असते. त्या भावविश्वात आपल्या भोवती , आपल्या सोबत असणा-या प्रत्येक व्यक्तिचा प्रवेश होत नाही ! एखादाच तिथे पोहचतो जो आपल्या आंतरिक संवेदनांना विचारांना समजू शकतो हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य  स्री-पुरूष दोघांनाही उदारतेने सन्मानाने स्वीकारता आले पाहिजे.

     जेव्हा स्री-पुरूष संबंध हा केवळ शारीरपातळीवरून जोखला जातो तेव्हा त्या नात्याला आपसुकच एक दुर्गंधी येते! खरं तर  या नात्याला अनेक कंगोरे आहेत.  जेव्हा एक प्रगल्भ स्री आणि एक प्रगल्भ पुरूष यांच्यात मैत्री होते ती परिस्थीतीच्या अधीन असते तरिही वास्तवाचे भान ठेवणारी आणि एकमेकांच्या स्वतंत्र संसारांचा आदर राखून एकमेकांच्या  सानिध्यात संपर्कात येऊनही परस्परांच्या आत्मीक उन्नती आणि प्रगतीसाठी प्रयत्नशील असते.. ! अशी मैत्री कुणालाही दिवास्वप्नच वाटेल पण अगदी रविंद्रनाथ टागोर, बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, गाोपाळकृष्ण गोखले, सरोजीनी नायडू यांनी अनुभवलेली स्रीपुरूष मैत्रीचे सामर्थ्य याच नातेसंबंधांवर आधारीत असलेल्या  अरूणा ढेरे यांच्या प्रेमातून प्रेमाकडे हे पुस्तकातून वाचायला अनुभवायला मिळते .  अगदी अलिकडचे जी. ए. कुलकर्णी सुनिता देशपांडे, एमरोज अमृता प्रितम साहिर लुधयानवी   या महान विभुतींची उदाहरणे पाहिली की स्री पुरूष मैत्रीचा एक  सुंदर आयाम आपल्याला समजतो.

ही अशी मैत्री दोघांचाही सन्मान, आदर  वाढवणारी आणि समाजात अभिमानाने मिरवता येणारी पाहिजे . 

     या संपुर्ण विचार संक्रमणात एकूणच  स्री - पुरूष नाते मग ते पती पत्नीचे असो वा अन्य कोणतेही  प्रत्येक नात्यात एक खरा सच्चेपणा पाहिजे  !  त्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास तर हवाच पण प्रत्येक नात्याला त्याचे एक विशीष्ट स्थान असते ते स्थान अबाधीत ठेवून त्याचा योग्य तो सन्मान करणे  आवश्यक आहे.

      थोडक्यात एक अस्तित्व दुस-या अस्तित्वाशी जोडले जाते ते त्यामधील समसंवेदनांमुळेच त्या जितक्या ख-या स्वच्छ निर्मळ तितकेच ते नाते पवित्र असे माझे प्रामाणिक मत आहे.  !

@  समिधा