सोमवार, २० जून, २०१६

भातुकली .....!!

                                   
                                                                           
                                      

     श्रीयाची भातुकली आवरत असतांनाच , "अगं ये सुमे तुझं लक्ष कुठे आहे ...?" भाताचं आंधण उतू गेलं तिकडे  ...!सासूबाईंची गर्जना कानी येताच सुमी किचन मध्ये धावली , पटकन भातावरचं झाकण काढायला गेली  आणि जोराचा हाताला चटका बसला , त्याचं तिला आणि सासुबाईंनाही काही वाटलं नाही , सासूबाई मान उडवून देवघरात निघून गेल्या .  हातावर फुंकर घालत सुमीने कांदा चिरायला घेतला  .... डोळ्याला पाण्याची धार लागली , नाक डोळे पुसत पुसत तिनं कांदा चिरून बाजूला ठेवला , तेवढयात बाहेर मोबाईलची रींग वाजली तिने भाताखालचा गॅस मंद केला आणि बाहेर हॉल मध्ये वाजणारा फोन घ्यायला गेली , पहाते तो सासूबाईंनी तो आधीच उचलला होता , " कोण बोलतय .... ? सुलभा  ...?  सुमती आहे नं .... सैपाक करते, काही निरोप आहे का   ...? सुमी दाराशी पदराला हात पुसत उभी होती , अधीरतेने ती फोन घ्यायला पुढे झाली , तेवढयात सासूबाईंनी " मग ठीक आहे   ... ! असं म्हणत फोन कट केला   !   सुमी तिथंच थबकली , सासुबाई  सुमिकडे पहात  म्हणाल्या  " सुलभाचा फ़ोन होता , फ़ोन करायला सांगितलय  ... नंतर कामं आटपल्यावर  . सुमि जागेवर गप्पच उभी , तिच्या डोळ्यातली आनंदाची चमक विझली , आणि मनातली अधिरताही तिथंच गोठली .  ती तशीच आत गेली ,  कामं आटपल्यावर   ...? म्हणजे जेवणं खावणं होईपर्यंत दुपार उलटून जाईल  .  प्रसाद दुकानातून घरी येऊन जेवून एक झोप काढून परत दुकानात जाईपर्यंत चार वाजतील   .  सासूबाई हल्ली दुपारच्या झोपत नाहीत, रात्री म्हणे त्यांना मग झोप लागत नाही , पाच वाजत नाहीत तर श्रीया शाळेतून घरी येऊन आई  भूक लागली करेल   .   सुलभाला फोन तरी कधी करावा   ...?  उगीच ती ऑफिसला दोन दिवस सुट्टी घेऊन बसेल , तिलाही ऑफिस , घर , मुलांचं ऍडजस्ट करावं लागेल  .   काय करावं ...?  सुमतीला काही सुचत नव्हतं .

     आठवड्यापूर्वी सुलभाचा फोन आला होता , कविता खूप आजारी आहे , तिला भेटायला जायला म्हणत होती  .  कविता त्यांची बालपणीची मैत्रीण तिचा कालपर्यंत काहीच संपर्क नव्हता पण तिच्या आजारपणाचा कळलं आणि सुमती कितीतरी वर्ष मागे गेली ....  कविता , सुमती आणि सुलभा अगदी बालवाडी पासूनच्या मैत्रिणी , कसं माहीत नाही पण तिघींची मैत्री शाळेतही कायम होती ,  नववीपर्यंत त्या तिघींचं विश्व म्हणजे शाळा ,अभ्यास, मस्ती आणि भातुकली   ...!   भातुकली खेळायची म्हणजे कित्ती  खुश असायच्या .  सुमतीच्या घराच्या मागच्या बाजूला एक मोठी पडवी होती , त्या पडवीतच तिघींचा स्वतंत्र संसार मांडला जायचा  .  जत्रेतून खरेदी केलेली छोटी छोटी भांडुली आणि झाडाची पानं म्हणजे पोळ्या , फुलं पाकळ्यांची  भाजी आणि लाल विटेचा बारीक चुरा म्हणजे लाल मसाला .  कधीतरी तिघींत पैसे काढून एखादा भिस्किटचा पुडाही असायचा   ...!  थोडे मोठ्या झाल्यावर पडवीतच तीन विटा मांडून जवळच्या झाडांच्या सुकलेल्या काट्याकुट्या गोळा करून चूल पेटवायच्या आणि कुणा एकीच्या आईकडून एक पातेले आणि मूठभर तांदळाचा भात  शिजवायच्या  ...! बाकी सगळं स्वतंत्र पण भात मात्र एकत्र शिजवायचा आणि मग तो अर्धा कच्चा शिजलेला भात मिटक्या मारत आनंदात खायचा  ...!

     या  भातुकलीच्या संसारात सुमीच्या घरासमोर कल्पनेतली फुलांची बाग असायची , दारात तुळस आणि एक विहीरपण असायची ती बागेला, तुळशीला पाणी घालायची ती विहिरीतून ताजं ताजं पाणी काढूनच ....!  तिला नवरा, दीर, नणंद सगळे असायचे पण ते नेहमी गावाला गेलेले असायचे  .  तिला सासू सासरे कधीच नसायचे .

     सुलभाच्या संसारात तिला फक्त एक बाळ असायचं , जे नुसतं रडायचं  आणि सुलभा त्याला सतत घेऊन थोपटत थोपटत जेवण करायची   ... तिच्याकडे एक मनीमाऊपण असायची जिला ती बाळाचं दूध प्यायची म्हणून नेहमी ओरडायची   ....

     कविताचा संसार नेटका असायचा .  तिला नवरा खूप आवडायचा , तो तिला फिरायला न्यायचा , तिला खूप खाऊ आणायचा , तिच्याकडे साडया , दागदागिने खूप असायच्या , ती नेहमी सजत धजत राहायची आणि खोट्या खोट्या आरशात पाहून सतत हसत राहायची    ...!

     हे सर्व आठवताच सुमतीला खुदकन हसायलाच आलं    ...!  तिला आठवलं नववीचा रिझल्ट लागला असतांनाच  तिच्या बाबांची बदली आनगांवला झाली आणि त्यांचं संपूर्ण बि-हाड सोनगांवहून  आनगांवला राहायला आलं . निरोप घेतांना तिघीं गळ्यात गेले घालून किती रडल्या होत्या    ...!

     इकडे आनगांवला सुमती एकटीच होती, पण नवीन गांव , नवीन शाळा, नवीन शिक्षक , मैत्रिणी आणि त्यात दहावीचं महत्वाचं  वर्ष म्हणून खूप अभ्यास त्यामुळे नवीन वातावरणातही ती रमून गेली   .   पण न चुकता ती सुलभा आणि कविताला पोस्टकार्डवर पत्र पाठवायची  .  नवीन शाळा , मैत्रिणी यांच्या गमती जमाती पत्रातून कळवायची , सुलभा कवितापण एकाच कार्डातून त्यांची खुशाली कळवत  राहायच्या   .

     दहावीची प्रिलिम चालू होती, आणि सुलभाचं पत्र आलं , ते पत्र वाचताच सुमतीच्या पायाखालची जमीन सरकली   ...!  पत्रात जे तिनं लिहिले होते त्यावर सुमतीचा विश्वास बसत नव्हता   .  कविताच्या आईवडिलांचा दोघांचाही  मृत्यू झाला होता   .  दोघेही त्यांच्या मूळ गांवी जात असतांना  ते जात असलेल्या जीपला एका मोठ्या ट्रकने धडक दिली होती, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता   ..  कविता आणि तिचा लहान भाऊ बंटीचा तो पोरका आक्रोश करणारा चेहरा क्षणात सुमतीच्या समोर येऊन गेला , तो दिवस तिचा सुन्न छिन्न भिन्न अवस्थेत गेला , तिने आईकडे सोनगांवला जाण्याचा हट्ट धरला.  दुस-या  दिवशीच ती सोनगांवला पोहचली पण कविताची भेट झालीच नाही, तिला पत्र मिळायच्या दोन दिवस आधीच कविताचे मामा मामी येऊन त्या दोघांना घेऊन त्यांच्या मुळगांवी निघून गेले होते  .   सुलभाने सांगितले कविता पार हादरली होती , कोलमडली होती , तिचा तो मामामामींबरोबर जातानाचा हतबल केविलवाणा चेहरा आठवून सुलभा रडत होती आणि मग सुमतीचाही बांध फुटला   .... कविता आता कधी केंव्हा भेटेल हे दोघीनांही माहीत नव्हते .

     बारावीला असतांना सुलभाने एका पत्रात कळविले होते की, कवितांच्या मामाने कविताचे लग्न लावून दिले आहे  .  गावचाच एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे   .  सुमतीला भातुकली खेळणारी चिमुकली कविता आठवली जिला "नवरा " खूप आवडायचा   ...!

     पुढे यथावकाश शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमती आणि सुलभाचेही लग्न झाली , सुमतीने गृहिणीपद स्वीकारलं तर सुलभा  एका सरकारी खात्यात नोकरीला लागली   .  मधल्या काळात दोघींचाही कविताशी काहीच संपर्क झाला नव्हता आणि अचानक एक दिवस सुलभाचा फोन आला,  कविता खूप आजारी आहे, तिला भेटायला  जायला पाहिजे   ...!

     सुलभाला फोन करण्या आधी माझं नक्की झालं पाहिजे, भांडी आवारता  आवरता सुमतीनं मनाशी पक्के केलं .  प्रासाद घरी आला की, जेवता जेवता त्याला सांगून टाकते , तोच मग सासुबाईंना सांगेल मग, दोन दिवसांचा तर प्रश्न आहे  , सासूबाई सांभाळतील दोन दिवस घर.... दुपारी प्रसाद घरी आला , सुमतीने तो हातपाय धुवून आल्याबरोबर समोर जेवणाचं ताट आणून ठेवले ,  आणि तिथंच घुटमळत उभी राहिली ... सुमा  ...!  आई जेवली का गं   ..? प्रसादने   नं राहून विचारले .  हो ... आत्ताच  जेवल्या आणि माझेही झाले  , शेवटी सुमतीने घाईघाईनेच विचारले अहो ...! , मी काय म्हणते, दोन दिवस मी मैत्रिणीकडे जाऊन येऊ का हो ...? प्रसाद जेवता जेवता थांबला ... नं कळून त्याने सुमतीकडे पाहिले ,
" कुठल्या मैत्रिणीकडे ...? प्रसाद .
"माझी शाळेतली मैत्रीण कविता ! " सुलभाकडून कळलं ती खूप आजारी तीच म्हणाली आपण तिला भेटून येऊ या ..! सुमतिने एक दमात सारं सांगितले .
कसं शक्य आहे .... सुमती ...? प्रसादचा आवाज मध्येच वाढला ... सुमती मनातून हिरमुसली . प्रसादने त्याचे म्हणणे सुरूच ठेवले ...
आईला दोन दिवस घर सांभाळता येईल  ...? श्रीया अजून लहान आहे तिची शाळा, ट्युशन , टिफिन कोण पाहील ..? जेवणाचं तर आईला आताच झेपत नाही . ,  कसं जमेल तुला जायला ...?
यावर सुमती काहीच बोलली नाही, प्रसाद जेवण आटपून खोलीत झोपायला निघून गेला  .

     सकाळी चटका लागलेला हात आता झोंबू लागला होता ... डोळ्यात पाणी तरारून आलं होतं ... तिनं जड मनाने सारं आवरायला सुरुवात केली आणि फ्रीजवरच्या घडाळ्याकडे पाहिले , दुपारचे तीन वाजत आले होते ... तिने सासूबाईंच्या खोलीचा कानोसा घेतला, तिकडे शांतता होती, सुमतीने हळूच मोबाईल उचलला आणि गॅलरीत गेली, सुलभाला फोन लावला .
 "अगं ... कधीची वाट पहात होते, कुठे होतीस ...?  सुलभाने जमेल तितक्या घाईने विचारले .
" सुलु ..., नाही गं जमणार यायला ...! सुमतीने खालच्या आवाजात सुलभाला सांगितले .
"अगं मीही तेच सांगायला फोन केला होता तुला ,  माझ्याही बाळाचा प्रॉब्लेम आहे गं ... बेबीसिटींगच्या बाई नेमक्या गावाला जाणार आहेत दोन दिवस मग मलाच थांबावे लागेल घरी , दर्शन , माझ्या नव-याला महत्वाची कॉन्फरेन्स आहे म्हणाला . सुमे नंतरच बघू या कधी जायला जमते  ते ... ! पलीकडून सुमतीचा काहीच रिप्लाय नाही हे पाहून , " अगं ऐकतेस ना ...? सुलभा
"हो गं , ऐकतेय  नां ...!  सुमती
"मग एकदम अशी  शांत का झालीस ...? सुलभाने  काळजीने विचारले .
"नाही गं ...!  पण काय हे सुलु आपण पुरते अडकलो गं संसारात ....! सुमतीच्या आवाजात कंप होता .
"पण तुला कुणी सांगितलं ... कविताच्या आजारपणाचं ....?" सुमती .
"बंटीनं , कविताचा  भाऊ ...". सुलभा
"तो कुठे भेटला तुला ....?" सुमतीने आश्चर्याने विचारले .
काही दिवसा पूर्वी माझ्या ऑफिस मध्ये त्याला कसलसं लायसन्स पाहिजे होतं म्हणून आला होता.  त्यांनच ओळखलं मला  . मी तर बाई ओळखलंच नाही त्याला . खूप लहान वयात मोठा झाल्यासारखा दिसत होता गं !
बराच वेळ बसला होता माझ्याकडे, त्याच्याकडूनच कळले कविताचे ... तिचा नवरा खूप दारू पितो म्हणे, रोजच शिव्या शाप आणि मारहाण करतो म्हणे तिला ...!  लहान वयात लग्न झालेल्या कविताला तेंव्हा काय समज असेल गं तिला ....! खेळायच्या , शिकायच्या दिवसांत तिच्यावर संसाराची एवढी मोठी जबाबदारी आली कशी पेलली असेल गं ...? बंटी सांगत होता कधी कधी खायलाही नसते घरात , एकच मुलगा पण त्याचेही हाल करतो नवरा ,  हा असा दारुड्या वाया गेलेला म्हणून आधीच सगळ्या नातेवाईकांनी त्यांना वाळीत टाकलेय , बंटीचं मग अधे मध्ये जाऊन कविताला पैसे देऊन येतो , पण त्याचाही तिच्या नव-याला राग येतो  ...  खायलाही देत नाही आणि भीकही मागू देत नाही अशी बिचारीची अवस्था करून ठेवली आहे.
"सुलु ...! सुमतीचा आवाज जड झाला होता...  काय गं हे भोग कविताचे ....? असला नवरा मेलेला बरा असंही म्हणवत नाही , तोच काय तो तिला आधार .... पण खरं तर तो असून नसून सारखाच गं ...! सुमतीच्या बोलण्यातून तिला कविताची काळजी वाटत होती हे दिसत होते ,
"हो गं ... खरं तर आपण आता तिच्या सोबत असायला पाहिजे पण परिस्थितीने आपलेही पाय बांधून ठेवलेत .. असं म्हणून सुलभाने हताश होऊन सुस्कारा सोडला ,
"मी बंटीचा मोबाईल नंबर घेतला आहे , तिच्याकडे गेल्यावर तो तिला फोन लावून देईन म्हणाला ,  तुला कळविनच ....  चल ठेवते फोन  म्हणत सुलभाने फोन कट केला .
 
     सुमतीचं  मन विषन्न झाले होते , तेवढ्यात दाराची काडी वाजली , प्रसाद दुकानात निघाला होता.  त्याला दारापर्यंत सोडून सुमती काडी लावून आत आली,  पाच वाजायला अजून वेळ होता ; कालचं गव्हाचं दळण तसंच निवडायचं राहून गेलं होतं .... तिनं चाळण घेऊन गव्हाचा डबा खाली अंथरलेल्या पेपरवर ओतला , गहू पाखडता पाखडता तिच्या विचारांची गिरण कधीच चालू झाली होती ....

     माझी , सुलभाची , कविताची लहानपणीची भातुकली कित्ती कित्ती मागे पडली  आहे .....!  माझी बाग , माझी तुळस , विहिरीतलं ताजं पाणी इथं कुठे आहे ...? सारंच पार सुकून गेलंय ..... !   सुलभाचं बाळ होतं पण त्याला थोपटायला आणि मनीमाऊला ओरडायला ती दिवसभर घरी कुठे होती ....? आणि कविता ...!  तिचा आवडता नवरा , तिला खूप खाऊ आणणारा प्रेमळ नवरा  तरी कुठे होता ...?  तिचं सजनं  धजनं  आरश्यात पाहून सतत हसणं  सारं सारं  कुठे होतं .....?  बालपणातल्या भातुकलीतल्या  आम्ही  त्याच आहोत ...... पण आता आमची भातुकली कुठे आहे ...? ती तर पार बदलली आहे ....... !

      आई .........! श्रीयाची हाक कानावर येताच सुमती भानावर आली ,  सुमतीनं कोप-यात पाहिलं श्रीयाची भातुकली अजून तशीच मांडलेली होती  ......!!



                                                                
                                                                            " समिधा "

   



 
 




 



   
     

1 टिप्पणी: